Back to list

योगिताचा वाढदिवस...

PRASHANT GAIKWAD (Administrator) | 14 Sep 2022 2:15 PM

*बाहेर प्रचंड पाऊस होता आणि राजच्या घरात आनंदाचा अपार पूर आलेला होता*


आज सकाळ पासूनच रिमझिम चालू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. बराच आळस अंगात भिनला होता. दुपारचे जेवण झाले आणि चांगलीच ताणून दिली.


तीनच्या आसपास फोन वाजला. अर्धवट झोपेतच फोन घेतला.


"दादा आज जायचे न वस्तीवर ? आम्ही कसे येऊ ?" योगिताचा फोन होता.


"अग पाऊस आहे. कसे जाता येईल ?"


"जाऊ न दादा. पाऊस थांबेल तो पर्यंत." योगिता खूपच तळमळीने बोलत होती.


ती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयात अंतिम वर्षाला शिकते. तिचा आज वाढदिवस होता. तिला वस्तीवरील मुलांच्या सोबत तो साजरा करायचा होता. मुलांसाठी केळी, बिस्कीट, वही पेन असे बरेच साहित्य तिने घेऊन ठेवले पण होते.


दुपारी पाचला आमचं जायचं ठरलं होतं. साडेचार वाजता जोरात पाऊस आला. योगिता कॉलेज मध्येच होती. ती पावसातच घरी आली. तिचा वस्तीत जाण्याचा निर्धार अपार होता. तिच्या निर्धारा पुढे माझा आळस फिका पडला.


पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. तशा परिस्थितीत. योगिता, योगिताची आई आणि सेवांकुरचा संयोजक महादेव सोबत शुभम आम्ही वस्तीवर पोहोचलो.


नेहमी आम्ही सगळे रस्त्यावरचे बसतो. आज तर चांगलाच पाऊस. वस्तीवरील राजचे घर आमच्या हक्काचे. गाडी वस्तीत पोहनचताच मी जोरात हॉर्न वाजवले. काही क्षणात चाळीस जण राजच्या छोट्या
पत्र्याच्या घरात दाटीवाटीने जमा झाली. योगिताचे स्वागत झाले. भरपूर गाणे म्हणलो. एकदम जल्लोषात योगिताचा वाढदिवस साजरा झाला. बाहेर प्रचंड पाऊस होता आणि राजच्या घरात आनंदाचा अपार
पूर आलेला होता. सगळेच काही भारलेले होते.


युवकांच्या मध्ये समाजाबद्दल कृतार्थ भाव नाही असे सर्वत्र म्हंटले जाते. त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मध्ये ते अजून कमी असा पण समज असतो. योगिता सारख्या मुली सेवांकुरच्या संपर्कात
येतात आणि अपार बदलून जातात. त्यांच्यात दिव्य भाव जागृत होतो. असे सेवेने भारलेले तरुण जर प्रत्येक भागात उभी राहिली तर वेगळेच चित्र आपल्याला पाहिला मिळेल.


योगिता आता नियमित वस्तीवर येणार आहे. तिच्या आईचा पण वस्तीवर येण्याचा संकल्प आहे. आज कमालीचा जोश मला स्वतःला जाणवत होता.


लेखक - श्री प्रसाद चिक्षे

अंबाजोगाई.

"ONE WEEK FOR NATION 2022 – SARAGUR, MYSORE, KARNATAKA"